आपल्या पॕरालिम्पिक विजेत्यांचे हे विक्रम माहित आहेत का? 

आपल्या खेळाडूंनी यंदा टोकियो आॕलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic)  आतापर्यंतचे आपले सर्वात मोठे यश मिळवले. एका सुवर्णपदकासह सात पदके आणि प्रत्येक रंगाचे किमान एक तरी पदक पहिल्यांदाच जिंकले. त्यापाठोपाठ आता पॕरालिम्पिकमध्येही (Tokyo Paralympic)  आपल्या दिव्यांग खेळाडूंनी देशाला आतापर्यंतचे सर्वाधिक यश मिळवून दिले आहे. दोन सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कास्यपदकं अशी आपली कमाई आहे.

भालाफेकीत सुमीत अंतीलचे विश्वविक्रमासह सुवर्ण, नेमबाजीत अवनी लेखराचे सुवर्ण, देवेंद्र झाझरिया (भालाफेक), मरियाप्पन थंगावेलू (उंच उडी), भाविनाबेन पटेल (टेबल टेनिस), योगेश काथुनिया (थाळी फेक), निशाद कुमार (उंच उडी) यांची रौप्यपदके आणि शरद कुमार (उंच उडी), सुंदरसिंग गुर्जर (भालाफेक), सिंघराज अदाना (नेमबाजी) यांच्या आपआपल्या गटातील कास्यपदकांनी आपल्या तिरंग्याची शान अधिक वाढली आहे. या यशादरम्यान भारतीय खेळाडूंनी बरेच संस्मरणीय विक्रम केलेत.

*एकाच दिवसात जिंकली पाच पदके

त्यातील पहिला आणि सर्वात अभिमानास्पद विक्रम म्हणजे 30 आॕगस्ट रोजी एकाच दिवसात आपण पॕरालिम्पिकसारख्या सर्वोच्च स्पर्धात पाच-पाच पदके जिंकली. विशेष म्हणजे त्यात दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कास्यपदक अशी तिन्ही रंगांची पदके होती आणि आॕलिम्पिक असो वा पॕरालिम्पिक असो, भारताने एका दिवसात जिंकलेली ही सर्वाधिक पदके होती. ह्याच्यापाठोपाठ 31 आॕगस्ट रोजीसुध्दा आपण एक रौप्य व दोन कास्यपदकांची कमाई केली. 30 आॕगस्ट हा तर सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा असा दिवस ठरला कारण पहिल्यांदाच आपण एका दिवसात दोन सुवर्णपदके जिंकली.  याप्रकारे दोन दिवसात पॕरालिम्पिकमध्ये आठ पदके जिंकण्याचा पराक्रम पहिल्यांदा तर आहेच, सोबत समस्त भारतियांची छाती अभिमानाने फुलविणारासुध्दा आहे. 

*भालाफेकीत व उंचउडीत दोन-दोन पदके

दुसरा विक्रम म्हणजे भालाफेकीत आणि उंचउडीत आपण दोन- दोन पदके जिंकली आणि हेसुध्दा पहिल्यांदाच घडले. भालाफेकीच्या एफ-46 गटात देवेंद्र झाझरिया हा रौप्यपदक विजेता ठरला तर याच गटात सुंदरसिंग गुर्जर कास्यपदक विजेता ठरला. याचप्रमाणे उंच उडीच्या टी-63 गटात मरियाप्पन थंगावेलू याने रौप्यपदक आणि शरद कुमारने कास्यपदक जिंकले. 2016 च्या रियो आॕलिम्पिकमध्ये टी-63 गटाच्या उंच उडीत मरियाप्पनने सुवर्ण आणि वरुण सिंग भाटीने कास्यपदक जिंकले होते. यावेळी आपण उंच उडीसोबतच भालाफेकीतही एकाच गटात दोन- दोन पदके जिंकली. 

*एकाच महिन्यात भालाफेकीत चार पदके

तिसरा चकित करुन सोडणारा विक्रम म्हणजे एकट्या आॕगस्ट महिन्यात भालाफेकीत आपण आॕलिम्पिक/ पॕरालिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये दोन सुवर्णपदकांसह चार पदके जिंकली. 7 आॕगस्टला नीरज चोप्राने आॕलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास घडवला. त्यानंतर पॕरालिम्पिकमध्ये एफ-64 गटात सुमीत अंतीलनेही सोनेरी यश मिळवले. याशिवाय देवेंद्र झाझरियाने एफ-46 गटात रौप्य आणि याच गटात सुंदरसिंग गुर्जरने कास्यपदक जिंकले. 

*सुमीत अंतीलचे तीन विश्वविक्रम

विशेष म्हणजे सुमीत अंतीलने (Sumit Antil) 68.55 मीटरवर भाला फेकण्याचा विश्वविक्रमही केला. केवळ एकदाच नाही तर तीन वेळा त्याने विश्वविक्रम केला आणि अंतिम फेरीतील चार सर्वोत्तम फेकी त्याच्याच होत्या. याचप्रकारे आॕलिम्पिकमध्येही पहिल्या फेरीत व अंतिम फेरीत नीरज चोप्राने सुरुवातीला केलेला थ्रो शेवटपर्यंत कुणीही मागे टाकू शकले नव्हते. सुमीत अंतील पहिलवान बनणार होता पण एका अपघातात डावा पाय गमावल्याने त्याचे ते स्वप्न अधुरेच राहिले. 

*झाझरिया तीन पदके जिंकणारा केवळ दुसरा

यावेळी भालाफेकीत रौप्यपदक जिंकलेला देवेंद्र झाझरिया हा पॕरालिम्पिकमध्ये तीन पदके जिंकणारा केवळ दुसराच भारतीय ठरला. 2004 व 2016 च्या पॕरालिम्पिकमध्ये देवेंद्रने सुवर्ण पदक जिंकले होते. जोगिंदरसिंग बेदी यांनी 1984 च्या पॕरालिम्पिकमध्ये एक रौप्य आणि दोन कास्यपदके जिंकली होती. त्यावेळी बेदी यांनी भालाफेक व थाळीफेकीत कास्यपदक तर गोळाफेकीत रौप्यपदक जिंकले होते. याच पंक्तीत मरियाप्पन थंगावेलूसुध्दा (Mariappan Thangavelu) आला आहे. त्याने 2016 मध्ये टी-42 गटात सुवर्ण पदक जिंकले होते आणि आता टी-63 गटात त्याने रौप्यपदक जिंकले आहे. याप्रकारे बेदी, झाझरिया व थंगावेलू हे तीनच भारतीय असे आहेत ज्यांनी पॕरालिम्पिकमध्ये एकापेक्षा अधिक पदके जिंकली आहेत. एवढेच नाही तर देवेंद्र झाझारिया हा एफ-46 गटात पॕरालिम्पिकची तिन पदके जिंकणारा एकमेव खेळाडू ठरला आहे. 

*अवनीचे सर्वात कमी वयात तर झाझरियाचे सर्वाधिक वयात यश

30 आॕगस्टचा दिवस आणखी एका कारणासाठी विशेष ठरला. ते म्हणजे की या एकाच दिवस भारताला सर्वाधिक वयाचा आणि सर्वात कमी वयाचे  आॕलिम्पिक/पॕरालिम्पिक विजेते मिळाले. नेमबाजीत एसएच- 1 गटात महिलांच्या 10 मीटर एअर रायफलचे सुवर्णपदक जिंकलेली अवनी लेखरा ही फक्त 19 वर्षांची आहे आणि या वयासह तिने भारतासाठी सर्वात कमी वयात आॕलिम्पिक/ पॕरालिम्पिक पदक जिंकायचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. दुसरीकडे देवेंद्र झाझरियाने 40 !वर्षे वयात जिंकलेले पदक हे कोणत्याही भारतीय खेळाडूने सर्वाधिक वयात जिंकलेले आॕलिम्पिक/ पॕरालिम्पिक पदक आहे. 

*अवनी पहिली सुवर्णविजेती भारतीय महिला

अवनी लेखराने (Avani Lekhara) 249.6 गुणांच्या कामगिरीसह विश्वविक्रमाची नोंद केली आणि नवा पॕरालिम्पिक विक्रम नोंदवला. ती आॕलिम्पिक वा   पॕरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिलीच भारतीय महिला ठरली. तिच्याआधी आॕलिम्पिकमध्ये पी.व्ही. सिंधू व मीराबाई चानू यांनी रौप्य तर पॕरालिम्पिकमध्ये दीपा मलिक व भाविनाबेन पटेल यांनीसुध्दा रौप्यपदकच जिंकले आहे. 

*काथुनियाचे प्रशिक्षकाशिवाय यश

थाळीफेकीत रौप्यपदक जिंकलेल्या योगेश काथुनीयाचे (Yogesh Kathunia) वैशिष्ट्य हे की त्याने कोणत्याही प्रशिक्षकाशिवाय हे रुपेरी पदक जिंकले. 

*झाझरियाचाच विश्वविक्रम मोडला सुवर्णविजेत्याने

देवेंद्र झाझरियाला (Devendra Jhajharia) ह्यावेळी रौप्यपदकावर समाधान मानायला लावताना ज्याने सुवर्ण पदक जिंकले त्या श्रीलंकेच्या दिनेश हेराथने झाझरियाचाच विश्वविक्रम मोडला. झाझरियाने पहिली दोन सुवर्णपदके जिंकतानासुध्दा विश्वविक्रम (तत्कालीन) केला होता आणि यावेळीसुध्दा त्याने आपला विश्वविक्रम सुधारला होता पण हेराथने तोसुध्दा मागे टाकला.

*सुंदरसिंग 2015 पर्यंत खेळायचा सामान्य खेळाडूंत

भालाफेकीत कास्यपदक जिंकलेला सुंदरसिंग गुर्जर (Sundarsingh Gurjar) हा 2015 पर्यंत सामान्य खेळाडूंच्या स्पर्धेत सहभागी होत होता. 2015 मध्ये एका घरगूती अपघातात त्याच्या डाव्या हाताचा पंजा गेल्यानंतर तो एफ-46 गटात सहभागी होऊ लागला. 

*सिंघराजने सुरूवात केली 35 वर्षे वयात

10 मी. एअर पिस्तुलचे कास्यपदक जिंकणाऱ्या सिंघराज अदाना (Singhraj Adana) हा 39 वर्षांचा असून कोविड काळात त्याने सरावासाठी स्वतःचीच शूटींग रैंज बनवली आहे. 35 वर्षे वयात त्याने ह्या खेळाला सुरुवात केली. त्याचे तीन तीन प्रशिक्षक आहेत. 

*भाविनाने टेबलटेनिसमध्ये केली पदकांची सुरुवात

भाविनाबेन पटेल (Bhavina Patel) ही टेबल टेनिसमध्ये भारताला आॕलिम्पिक वा पॕरालिम्पिक पदक जिंकून देणारी पहिली खेळाडू ठरली. तिने ह्यादरम्यान जगातील दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूंना मात दिली. 

*निशाद कुमारचा आशियाई विक्रम

निशाद कुमारने (Nishad Kumar) उंच उडीत पार केलेले 2.06 मीटरचे अंतर हा नवा आशियाई विक्रम आहे. 14 वर्षांपूर्वी चारा काटण्याच्या मशिनीत त्याने आपला उजवा हात गमावला होता. 2017 च्या आधीपर्यंत तो सामान्यांच्या स्पर्धांतच सहभागी होत होता. 


Write a comment ...

LalitMBA

Sports affecrionate, Nature lover, loves to roam freely, Simple soul