चानूच्या रुपेरी यशाने पहिला दिवस समाधानाचा

हॉकी, टेबल टेनिस व टेनिसमध्ये संमिश्र यश

नेमबाजी व तिरंदाजीत मात्र निराशा

बॉक्सींग व ज्युदोमध्ये घोर अपयश

टोकियो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympic) स्पर्धांचा पहिला दिवस भारतासाठी यशाचा राहिला. वेटलिफ्टींगमध्ये मिराबाई चानू (Meerabai Chanu) हिने अपेक्षेप्रमाणे पदक कमावले. टेनिसमध्ये २५ वर्षानंतर भारतीय खेळाडूने पहिली फेरी पार केली. टेबल टेनिसमध्ये २९ वर्षात पहिल्यांदाच भारतीय खेळाडूंनी विजयी सुरुवात केली. हॉकीतही आपल्या पुरुषांनी न्यूझीलंडवर ३-२ बाजी मारली. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये बहुधा पहिल्यांदाच भारताची एवढी चांगली सुरूवात झाली आहे.

मिराबाई चानू हिने ऑलिम्पिक विक्रमासह भारताचे पदकाचे खाते खोलले. ४९ किलोगटात २०२ किलो वजन उचलण्याच्या कामगिरीसह ती भारताची केवळ दुसरीच महिला रौप्यपदक विजेती ठरली आणि ऑलिम्पिक पदक जिंकणारी दुसरीच भारतीय महिला ठरली. या स्पर्धेत मिराबाई पदकाची दावेदार होतीच त्यामुळे तिने अपेक्षापूर्ती केली.

  1. टेबल टेनिस

टेबल टेनिसमध्ये गेल्या २९ वर्षात भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये एकही सामना जिंकलेला नव्हता पण यंदा मनिका बत्रा व सुतिर्था मुखर्जी यांनी विजयी सुरुवात करत आपली आगेकूच सुरू ठेवली आहे. मनिकाने ब्रिटनच्या हो टीन-टीन हिला ११-७, ११-६, १२-१०, ११-९ अशी सरळ मात दिली तर सुतिर्था हिने स्वीडनच्या लिंडा बर्गस्ट्रॉम हिच्यावर शेवटचे तीन सेट जिंकत ४-३ असा विजय मिळवला. सुतिर्था हिने ही लढत ५-११, ११-९, ११-१३, ९-११, ११-३, ११-९, ११-५ अशी १-३ अशा पिछाडीवरुन जिंकली. मनिकाचा विजय अपेक्षीत पण सुतिर्थाचे हे यश अनपेक्षीत म्हणता येईल.

मिश्र दुहेरीत मात्र निराशा पदरी पडली. मनिका बत्रा व अचंता शरथ कमल ही जोडी ०-४ अशी तैपेईच्या लिन यून जू व चेंग आय जींग यांच्याकडून पराभूत झाली.

  1. बॕडमिंटन

टेबल टेनिसप्रमाणेच बॅडमिंटनमध्यही संमिश्र यश राहिले. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकिरेडूडी व चिराग शेट्टी या जोडीने जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या जोडीला मात दिली. त्याचा ली यांग व वँग ची लीन यांच्यावरील विजयाची खरं सांगायची तर अपेक्षा नव्हती पण त्यांनी २१-१६, १६-२१, २७-२५ असा रोमांचकारी विजय मिळवला. एकेरीत ज्याच्याकडून अपेक्षा होती त्या साई प्रणीतने मात्र निराशा केली. तो इस्त्राइलच्या मिशा झिल्बेरमानकडून सरळ २-० असा पराभूत झाला.

  1. टेनिस

टेनिसमध्ये सुमीत नागलला शेवटच्या क्षणाला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळाले आणि त्याने ही संधी वाया जाऊ दिली नाही. त्याने आशियाड विजेता उझबेकी खेळाडू डेनिस एस्टोमीन याला अडीेच तासाच्या संघर्षानंतर मात दिली. सुमीतचा ६-४, ६-७, ६-४ असा हा विजय म्हणजे ऑलिम्पिक टेनिसमध्ये भारताने पुरुष एकेरीत २५ वर्षात जिंकलेला पहिलाच सामना ठरला. मात्र आता सुमीतपुढे मोठे कठीण आव्हान आहे कारण त्याचा सामना आता जगातील नंबर दोन दानिल मेद्वेदेवशी होणार आहे.

  1. तिरंदाजी

तिरंदाजीत दीपिका कुमारी व प्रवीण जाधव या जोडीने मिश्र दुहेरीत चांगली सुरुवात केली होती पण क्वार्टर फायनलमध्ये त्यांचे आव्हान संपले. खरे म्हणजे या गटात दीपिका असल्याने पदकाची आशा बाळगली जात होती.तैेपेईविरुध्द ०-२ अशा पिछाडीवरुन ५-३ अशी बाजी मारुन त्यांनी आशासुध्दा जागवल्या होत्या पण क्वार्टर फायनलमध्ये त्यांचा प्रतिकार दक्षिण कोरियन दुकलीने मोडून काढला आणि २-६ असा पराभव दीपीका व प्रवीणला पत्करावा लागला.

  1. नेमबाजी

नेमबाजीत असेच काहीसे साैरभ चौधरीबाबत झाले. १० मी. एअर पिस्तुलमध्ये तो पदकाचा दावेदार होता. त्याने सुरूवातही तशीच केली होती. पात्रता फेरीअखेर तो पहिल्या स्थानी होता पण तो फॉर्म त्याला कायम राखता आला नाही आणि शेवटी तो सातव्या स्थानी राहिला. याच स्पर्धाप्रकारात अभिषेक वर्मा अंतिम फेरीसुध्दा गाठू शकला नाही.सौरभ चौधरी अपेक्षेप्रमाणे पदक जिंकू शकला नसला तरी त्याची कामगिरी मात्र चांगली झाली हे नमूद करावे लागेल.

महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये जगातील नंबर वन एलावेनील वेलारिव्हन व अपूर्वी चंदेला यांनी घोर निराशा केली. या दोघी अंतिम फेरीसुद्धा गाठू शकल्या नाहीत.

6 व 7 - बॉक्सिंग व ज्युदो

बॉक्सिंग व ज्युदोमध्ये मात्र विकास कृष्ण व सुशीला देवी यांनी फार निराश केले. दोघांनाही पराभव पत्करताना प्रतिस्पर्धांिवरुध्द एकसुध्दा गूण घेता आला नाही.

  1. हाॕकी

हाॅकीत भारतीय पुरुषांनी विजयी सुरुवात केली त्यासाठी धन्यवाद गोलरक्षक श्रीजेशच्या कामगिरीला द्यायला हवे. सामना संपायला २४ सेकंद असताना त्याने पेनल्टी काॅर्नर वाचवला नसता तर आपला न्यूझीलंडवरील ३-२ असा विजय साजरा झाला नसता. अखेरच्या तीन मिनिटात श्रीजेशने वाचवलेले तीन गोल भारताला विजय मिळवून देणारे ठरले आणि त्यामुळे भारतीय हॉकी संघाची विजयी सुरुवात झाली.

महिला हॉकी संघ मात्र नेदरलँडकडून १-५ असा पराभूत झाला. मध्यंतरावेळी भारतीय महिला १-१ अशा बरोबरीत होत्या पण उत्तरार्धात त्या गोल तर करु शकल्या नाहीतच पण डच आक्रमण रोखूसुद्धा शकल्या नाहीत.

  1. नौकानयन

नौकानयनात अर्जुनलाल व अरविंद सिंग हे प्राथमिक फेरीत पाचव्या स्थानी आले. त्यामुळे ते उपांत्य फेरीच्या आधी बाद झाले असले तरी रिपकेज फेरीसाठी पात्र ठरले असल्याने त्यांच्या पदकाच्या अाशा अजून जिवंत आहेत.

Write a comment ...

LalitMBA

Sports affecrionate, Nature lover, loves to roam freely, Simple soul