मिराबाई चानू - रियोची निराशा ते टोकियोतील भरारी

टोकियो आॕलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic)  मिराबाई चानू (Meerabai Chanu)  हिने रौप्यपदक जिंकून पहिल्याच दिवशी पदकतालिकेत भारताचे खाते खोलले आहे. महिला वेटलिफ्टिंगच्या 49 किलो गटात हे यश मिळवताना तिने 202 किलो वजन उचलण्याचा आॕलिम्पिक विक्रमही केला.

आॕलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये भारताचे हे पहिले रौप्यपदक आहे. यापूर्वी 2000 च्या सिडनी आॕलिम्पिकमध्ये कर्नम मल्लेश्वरीने कास्यपदक जिंकलै होते. 

या गटातील विश्वविक्रम नावावर असलेल्या चीनच्या हु झीहुई हिने 210किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. इंडोनेशियाच्या एसा विंडी कांतिका ही 194 किलो वजन उचलून तिसऱ्या  स्थानी राहीली.

माजी विश्वविजेती असलेल्या मिराबाई चानू हिने आता आशियाड, राष्ट्रकूल, वर्ल्ड चॕम्पियनशीप आणि आता आॕलिम्पिक अशी सर्व मानाची पदके जिंकली आहेत.

मिराबाईने सुरुवात स्नॕचमध्ये 84 किलो वजन उचलून केली. त्यानंतर 87 किलो वजनही तिने उचलले पण 89 किलो स्नॕच करण्यात ती अपयशी ठरली.

क्लिन अँड जर्क हा तिचा आवडता प्रकार. यात 110 व 115 किलो वजन उचलल्यावर 117 किलोचा तिचा प्रयत्न फसला. मात्र तोवर तिचे रौप्यपदक निश्चित झालेले होते. 

मिराबाईने 2014 मध्ये राष्ट्रकूल रौप्यपदक जिंकून पहिले मोठे यश मिळवले होतै. ग्लासगो येथे 48 किलोगटात ती दुसरी होती. त्यावेळी सुवर्णपदकाला तिला तीन किलो वजन कमी पडले होते. 

2016 मध्ये रियो आॕलिम्पिकवेळी मिराबाई स्नॕचच्या तिन्ही प्रयत्नात असफल ठरली होती. मात्र ते अपयश पुसून काढताना तिने यावेळी स्नॕचमध्ये,आपल्या सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी केली. 

रियोमध्ये ती प्रचंड दडपणात होती. त्यामुळे सहा प्रयत्नात एकदाच ती वजन उचलण्यात सफल ठरली होती. मात्र त्यानंतर राष्ट्रकूल अजिंक्यपद स्पर्धा आणि वर्ल्ड चॕम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक जिंकून रियोमधील तो तेवढा एक दिवस खराब होता हे दाखवून दिले होते.

2018 च्या गोल्डकोस्ट राष्ट्रकूल सामन्यांमध्येही तिने सुवर्णपदक जिंकताना नवा राष्ट्रिय विक्रम नोंदवला.

मात्र त्यानंतर पाठदुखीमुळे तिला 10 महिने बसुन रहावे लागले. 

2019 मध्ये ती पुन्हा स्पर्धात परतली आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धा व वर्ल्ड चॕम्पियनशीपमध्ये सहभागी झाली.

यंदा एप्रिलमध्ये उझबेकिस्तान मधल्या एशीयन चॕम्पियनशीपमध्ये तिने क्लिन अँड जर्कचा 119 किलोचा विश्वविक्रम नोंदवला होता.त्यावेळी कास्यपदक जिंकतानाच तिने टोकियो आॕलिम्पिकमधील आपले स्थान निश्चित केले होते. 

Write a comment ...

LalitMBA

Sports affecrionate, Nature lover, loves to roam freely, Simple soul