‘तेरावं वरीस यशाचं’

चिमुरड्या स्केटबोर्डर्सनी घडवला इतिहास

आपण म्हणतो ‘सोळावं वरीस धोक्याचं’ पण टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) काही खेळाडूंनी ‘सोळा’ नाही तर ‘तेरावं वरीस यशाचं’ अशी नवी म्हण केली आहे.अवघ्या १३ वर्षे वयाचे खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण व रौप्यपदक विजेते ठरले आहेत आणि ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वात कमी वयात सुवर्णपदक जिंकायचा विक्रमही थोडक्यात वाचला. ब्राझीलची रौप्यपदक विजेती खेळाडू सुवर्णपदक विजेती ठरली असती तर १९३६ पासूनच तो विक्रमसुद्धा मोडला गेला असता.

ऑलिम्पिकमध्ये हा इतिहास घडवणाऱ्या चिमरुड्या आहेत जपानच्या मोमीजी निशिया (Momiji Nishiya, Japan) आणि ब्राझिलची रेस्सा लील (Rayssa Leal, Brazil). दोघीही १३ वर्षांच्या. अचूक सांगायचं तर मोमीजी ही १३ वर्ष ३३० दिवस वयाची आणि रेस्सा १३ वर्ष २०३ दिवस वयाची आणि त्यांनी इतिहास घडवलेला खेळ म्हणजे ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच होणारा स्केटबोर्डींग (Skateboarding) .

त्यातील महिलांच्या स्ट्रीट स्केटबोर्डींगमध्ये मोमीजीने १५.२६ च्या स्कोअरसह सुवर्णपदक जिंकले आणि रेस्सा ही १४.६४ च्या स्कोअरसह रौप्यपदक विजेती ठरली. कास्यपदक विजेतीही वयाने काही फार मोठी नाही. ती आहे जपानचीच फुना नाकायामा. फुनाचे वय १६ वर्ष आणि तिची कामगिरी १४.४९ गुणांची. नावावर कास्यपदक.

याप्रकारे फक्त १३ वर्षे वयाची सुवर्णपदक आणि रौप्यपदक विजेती बघायला मिळाली. यापैकी रेस्सा ही विजेती ठरली असती तर ऑलिम्पिक इतिहासातील ती सर्वात कमी वयाची सुवर्णपदक विजेती ठरली असती. १९३६ पासून अजुनही हा विक्रम अमेरिकेच्या मार्जोरी जर्स्ट्रींग हिच्या नावावर आहे. तिने बर्लीन येथे स्प्रींगबोर्ड डायव्हिंगचे सुवर्णपदक जिंकले होते त्यावेळी तिचे वय होते फक्त १३ वर्ष २६८ दिवस आणि आताची स्केटबोर्डींग राैप्यपदक विजेती रेस्सा लिल हिचे वय आहे १३ वर्ष २०३ दिवस.

या चिमुरड्यांनी टोकियोच्या उन्हात स्केटबोर्डवर अडथळे आणि रेलींग पार करायचे जे कौशल्य दाखवले ते अफलातून होते. एरियाके अर्बन स्पोर्टस पार्कवरचे अडथळे व रेलिंग ह्या आम्हाला रोखू शकत नाही हे त्यांनी सिध्द केले. या स्पर्धाप्रकारात मोमोजी ही पहिली ऑलिम्पिक विजेती आणि जपानची सर्वात कमी वयाची सुवर्णपदक विजेती ठरली. तिच्याआधी जपानसाठी १९९२ च्या सामन्यांमध्ये क्याको इवासाकी हिने १४ वर्ष वयात जलतरणाचे सुवर्ण जिंकले होते.

मोमीजी पहिल्या दोन प्रयत्नात अपयशी ठरली होती. त्यामुळे आपण विजेते ठरु असे निम्मी स्पर्धा होईपर्यंत वाटत नव्हते पण इतर स्केटर्स मला प्रोत्साहीत करत होते त्यामुळे माझा उत्साह टिकून राहिला असे तिने नंतर मुलाखतीत सांगितले. याच स्पर्धाप्रकारात पुरुषांचे सुवर्णपदकही जपानलाच मिळाले असून त्यांचा युतो होरीगोम विजेता ठरला आहे.

निशियासाठी १३ वर्षे वयातही यशाची सवय झालेली आहे. तिने समर एक्स गेम्समध्येही २०१९ मध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे आणि यंदा जूनमध्येच पार पडलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्येही ती रौप्यपदक विजेती आहे. तिथेही रेस्सा लील ही निशियाच्या मागे तिसर्या स्थानी होती.

मोमोजी, रेस्सा व फुना या तिन्हीच पदकं जिंकणार हे अंतिम प्रयत्नाआधीच निश्चित झालेले होते फक्त कोण कोणत्या रंगाचे पदक घेणार एवढाच प्रश्न होता. अशावेळी लील ही धडपडली तर निशियाने आघाडीवर असूनही धोका पत्करण्याचे धाडस दाखवत ३.४३ गूण कमावले तर नाकायामा ही शेवटच्या प्रयत्नात अपयशी ठरल्याने त्यांच्या पदकांचा क्रम ठरला.

या तिन चिमुरड्याच्या तुलनेत दोन वेळची वर्ल्ड चॅम्पियन निशीमुरा ही फिकी पडली. ती अंतिम फेरीत दोन वेळा पडली आणि पाच पैकी एकच प्रयत्न व्यवस्थित करु शकली. यामुळे तिला शेवटच्या स्थानी समाधान मानावे लागले.

Write a comment ...

LalitMBA

Sports affecrionate, Nature lover, loves to roam freely, Simple soul