मिराबाईचे यश म्हणजे तिरंदाजीने गमावले ते वेटलिफ्टिंगने कमावले

आॕलिम्पीकमध्ये (Olympic) भारताला रौप्यपदक जिंकून देणारी केवळ दुसरीच महिला ठरलेल्या मिराबाई चानूच्या (Meerabai Chanu)  मणिपुरातील गावी आनंदाला उधाण आले आहे. त्यासोबतच मिराचे हे यश म्हणजे धनुर्विद्येने (Archery)  जे गमावले ते वेटलिफ्टिंगने (Weightlifting) कमावले असे आहे. हा धनुर्विद्येचा म्हणजे तिरंदाजीचा मिराबाईच्या आयुष्यात मोठा भाग आहे. 

26 वर्षांची मिराबाई ही मणिपूरची. नांगपोक काकचिंग हे तिचे गाव.  इम्फाळपासून साधारण 20 किलोमीटर दूर. मीराबाई ही खरे तर तिरंदाजच व्हायची...पण ती वेटलिफ्टर कशी झाली आणि स्वच्छ व निटनेटके राहण्याची आवड तिला वेटलिफ्टिंगकडे कशी घेऊन आली याची कहाणी मोठी मनोरंजक आहे. 

मणीपूरच काय ईशान्येकडील राज्यात लोकं फूटबॉलचे दिवाने...पण मीराला फूटबाॕल काही आवडायचे नाही. याचे कारण ती सांगते, "माझे जवळचे लांबचे सर्व भावंड फूटबॉलच खेळायचे आणि दिवसभर फूटबॉल खेळून अतिशय अस्वच्छ रुपात घरी परतायचे. ते मला अजिबात आवडायचे नाही. आपल्याला आवड होती स्वच्छता व टापटीप राहण्याची...म्हणून फूटबॉल आपल्यासाठी नो...नो'च होते ..मला खरं म्हणजे धनुर्विद्या हा खेळ आवडायचा...कारण ते तिरंदाज किती स्वच्छ, निटनेटके आणि स्टायलीश रहायचे तेच मला आवडायचे. मी माझ्या भावांसोबत खेळाच्या सुविधांच्या शोधात इम्फाळच्या साई सेंटरला आले.2008 मधील ती गोष्ट पण त्या सेंटरवर मला धनुर्विद्येचे कुणी प्रशिक्षक मिळाले नाहीत. मात्र कुंजरानी देवीच्या काही क्लिपिंग्ज मी पाहिल्या आणि आपण प्रभावित झालो. लगेच वेटलिफ्टिंग ट्रेनिंग सेंटरला गेले आणि योगायोगानै तिथे आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर आणि प्रशिक्षक अनिता चानू भेटल्या आणि पुढचा इतिहास तुम्हा सर्वांना माहिती आहे. "

आपल्या गावाहुन दररोज 20-22 किमी अंतरावरच्या ट्रेनिंग सेंटरला येणे मिरासाठी सोपे नव्हते. एकतर शाळेच्या वेळापत्रकाशी जुळवणे अवघड होते आणि दुसरे म्हणजे सकाळी 6 वाजताच पोहचायचे होते. त्यात दोन वेळा बस बदलावी लागायची. पण मीराला कुंजरानीसारखे व्हायचे होते. 12 वर्षाची असल्यापासुनच आपल्या मोठ्या भावापेक्षा अधिक वजनाचे सरपण ती उचलायची. लाकडे कापायची, तोडायची, जवळच्या तळ्यातून पाणी आणायची. ही मेहनत तिची फळाला आली आहे.


आज जवळपास सर्वच प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांची पदकं तिच्या नावावर आहेत, खेलरत्नचा सन्मान तिला मिळालाय आणि रेल्वेत तिकिट निरिक्षकाची नोकरी ती करतेय. टोकियोला पात्र ठरल्यापासुनच ती पदकाची दावेदार मानली जात होती. 

2009 मध्ये ती पहिल्यांदा राष्ट्रीय विजेती ठरली. 2012 मध्ये तिने आशियाई ज्युनियर स्पर्धेत कास्यपदक जिंकले, 2014 ला ग्लासगो राष्ट्रकूलमध्ये 170 किलो आणि 2016 च्या राष्ट्रीय स्पर्धात तिने 186 किलो वजन उचलून दाखवलै. रियोतील निराशेनंतर ती विश्वाविजेती बनली. राष्ट्रकूल विजेतीही बनली आणि आता आॕलिम्पिकमध्येही तीने पदक जिंकले. त्साठी पाठदुखीवर मात करत तिने वजनगटही बदलला. अमेरिकेतील सेंट लुईस येथे तिने शारीरिक तंदुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले. डॉ आरोन होर्शिग या नामवंत फिजिओने तिला मार्गदर्शन केले आणि अस्थिर व कमकुवत उजवा खांदा, आखडलेला डावा खांदा ह्या कमजोरींवर मात करत आता 200 किलोच्यावर वजन उचलून तिने आॕलिम्पिक विक्रमही नोंदवला.चिनी वेटलिफ्टरना टक्कर देणारी ती पहिली भारातीय आहे. अगदी सुवर्णपदक विजेती हू झिहूई हिलासुध्दा तिने क्लिन अँड जर्कमध्ये फिके पाडले आहे. 

साहजिकच आपल्या गावच्या लेकीच्या या यशाने नांगपोक काकचिंग या तिच्या गावच्या लोकांच्या आनंदाला उधाण आले आहे. मिराबाईचे गौरवास्पद यश हे तर त्याचे कारण आहेच पण तिने पदक जिंकावं अशी त्यांची मनापासून इच्छा होती कारण मिराबाई पदक जिंकली तर आपल्या गावात किमान रस्ते, पाणी, वीज अशा मुलभूत सुविधा येतील अशी त्यांना आशा आहे. ही आशा भाबडी न ठरो आणि आता नांगपोक काकचिंग या इम्फाळपासुन अवघ्या 20 किलोमीटरवरील गावाला ह्या सुविधा मिळोत. तसे झाले तर मिराबाईसाठी सुवर्णपदकाएवढे ते यश असेल हे निश्चित. 

Write a comment ...

LalitMBA

Sports affecrionate, Nature lover, loves to roam freely, Simple soul