यंदाचा राष्ट्रीय क्रीडा दिवस ‘स्पेशल’ बनविणारी 27 कारणे! 


यंदाचा राष्ट्रीय क्रीडा दिवस (National Sports Day)   खासच आहे कारण आपल्या खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) मिळवलेले दिमाखदार यश आणि केंद्र सरकारने अलीकडेच घेतलेला एक निर्णय. अशी एक दोन नव्हे तर 27 कारणे आहेत ज्यांनी यंदाचा राष्ट्रीय क्रीडा दिवस स्पेशल बनवलाय.  

----------- 1 ----------

ज्या महान विभूतीच्या जयंतीदिनी आपण हा दिवस साजरा करतो त्या मेजर ध्यानचंद (Major Dhyanchand) यांचे नाव यंदापासूनच देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार ‘खेलरत्न’ला देण्यात आले आहे. आता देशातील सर्वोत्तम क्रीडापटू  मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने (Major Dhyanchand Khel Ratna Award) सन्मानीत होणार आहे.

................... 2 ..............

यंदाचा राष्ट्रीय क्रीडा दिवस खास बनवणारे दुसरे कारण म्हणजे टोकियो ऑलिम्पिकमधील आपले यश. ऑलिम्पिकच्या इतिहासात सुवर्णपदकासह सर्वाधिक सात पदकांची कमाई आपण यंदाच केली आहे.

.................. 3 ...............

नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने ॲथलेटिक्समधील पहिले आणि देशासाठी वैयक्तिक केवळ दुसरेच पदक जिंकून देत भारताच्या क्रीडा इतिहासात मानाचे पान लिहिले आहे.  त्यातही पात्रता फेरी असो की अंतिम फेरी, त्यात त्याने भालाफेकीत ‘स्टार्ट टू फिनीश’ अशी आघाडी राखून आपल्या स्पर्धेत जगभरात कुणीच नाही हे सिध्द केल्याने अभिमानाने छाती फुलली.

------------- 4 --------------

ज्यांच्यामुळे आपल्याला सुवर्णयुग पहायला मिळाले त्या मेजर ध्यानचंद ह्यांच्याच खेळात म्हणजे हॉकीमध्ये १९८० नंतर पहिल्यांदाच आपण पदक जिंकले आहे आणि आपल्या महिलासुद्धा पदकापासून अगदी थोड्याने वंचित राहिल्या. महिला हॉकी संघाने पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठून इतिहास घडवला.

------------ 5 -------------

पी.व्ही.सिंधू ही दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिलीच भारतीय महिला ठरली. २०१६ मध्ये सिंधूच्या गळ्यात रौप्यपदक चमकले होते. यावेळी कास्यपदक चमकले. लागोपाठच्या ऑलिम्पिकमधील या यशाशिवाय विश्वविजतेपद आणि सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची तिच्यासारखी कामगिरी अख्ख्या जगात इतर कोणत्याही बॅडमिंटनपटूला जमलेली नाही. २०१९ मध्ये सिंधूने विश्वविजेतेपदही आपल्या नावावर केलेले आहे.

--------------- 6 -------------

आपण ऑलिम्पिकमध्ये  एकाच दिवसात दोन दोन पदके जिंकू शकतो असे पहिल्यांदाच दिसून आले. ७ ऑगस्ट रोजी नीरज चोप्राचे सुवर्ण आणि दीपक पुनियाचे कास्यपदक आणि त्याच्याआधी ५ ऑगस्टला रवीकुमार दहियाचे कुस्तीत रौप्य आणि पुरुष हॉकी संघाचे कास्यपदक असे दुहेरी यश आपण पहिल्यांदाच मिळवले.

------------- 7 ---------------

एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कास्यपदकांसह आपण पदकतालिकेत ४८ व्या स्थानी राहिलो. १९८० नंतर पहिल्यांदाच भारताचे नाव ‘टॉप फिफ्टी’मध्ये झळकले.

--------------- 8 --------------

एकाच ऑलिम्पिकमध्ये तिन्ही रंगांची पदके आपण पहिल्यांदाच जिंकली आणि तिरंग्याची शान व दिमाख अधिकच वाढला.  अशीच आपली वाटचाल सुरु राहिली तर ‘टॉप ट्वेंटी’ आणि पुढे जाऊन ‘टॉप टेन’ मध्येही स्थान मिळवणे अशक्य नाही याचा विश्वास आता जागला आहे.  

-------------- 9 --------------

मीराबाई चानू ही वेटलिफ्टींगमध्ये भारताला रौप्यपदक जिंकून देणारी पहिली खेळाडू ठरली. याच्याआधी सिडनी २००० मध्ये कर्नम मल्लेश्वरी हिने ऑलिम्पिक पदक जिंकले होते पण ते कास्यपदक होते. मीराबाईचे यश त्याच्या एक पायरी वरचे आहे.

------------- 10 --------------

बॉक्सिंगमध्ये विश्वविजेती व माजी ऑलिम्पिक पदक विजेती मेरी कोम ही पक्षपाती निर्णयाची बळी ठरली पण तिच्या ह्या अपयशाची भर लव्हलिना बोर्गोहेन हिने कास्यपदक जिंकून काढली. नऊ वर्षानंतर बॉक्सिंगमध्ये भारताच्या नावावर कास्यपदक लागले.

--------------- 11 ------------

कमलप्रीत कौर हिने थाळीफेकीत अंतिम फेरी गाठली. पात्रता फेरीत दुसरी सर्वोत्तम फेक करुन तिने पदकाच्या आशा जागवल्या होत्या पण तिला सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले पण कितीतरी वर्षात पहिल्यांदाच ॲथलेटिक्समध्ये कुणी भारतीय खेळाडू अंतिम फेरीत पोहचली.

--------------- १२ ------------

गोल्फ या फारशा लोकप्रिय नसलेल्या खेळाकडे आदिती अशोक हिने आपल्या अनपेक्षीत पण दिमाखदार कामगिरीने साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. २०० व्या क्रमांकावर असलेली ही खेळाडू अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पदकाच्या स्पर्धेत होती. कितीतरी काळ तर ती रौप्यपदकाची दावेदार होती पण अगदी शेवटच्या फटक्यावर तिचे पदक हुकले पण तिने नवा इतिहास घडवला.

--------------- 13 ------------

बॕडमिंटन पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकी रेड्डी व चिराग शेट्टी ही जोडी कमनशिबी ठरली कारण साखळीतील तीन पैकी दोन सामने जिंकल्यावर आणि पुढे जाऊन ज्यांनी सुवर्णपदक जिंकले त्यांना मात दिल्यावरसुद्धा त्यांचे आव्हान साखळीतच संपले.

--------------- 14 ------------

नौकानयनात म्हणजे रोईंगमध्ये अर्जुन लाल जाट व अरविंद सिंग यांची अतिशय चांगली कामगिरी करुन सर्वांना आश्चर्यांचा धक्का दिला. डबल स्कल्स दुहेरी या प्रकारात उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलेली ही पहिलीच भारतीय जोडी ठरली आणि त्यांनी कमावलेले ११ वे स्थान ही अपेक्षेपेक्षा कितीतरी उजवी कामगिरी ठरली.

--------------- 15 ------------

सी.ए.भवानीदेवीच्या रुपाने ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच तलवारबाजीत कुणी भारतीय स्पर्धक दिसला/ दिसली आणि तिने फक्त टोकियोची वारीच केली नाही तर पहिली फेरी पार करत आपल्यात क्षमता असल्याचेही दाखवून दिले.

--------------- 16 ------------

अश्वारोहणात फौआद मिर्झा यांनी असाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. २००० नंतर पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये भारतीय अश्वारोहक दिसला आणि त्यांनी अंतिम फेरी गाठत २३ वे स्थान प्राप्त केले. ड्रेसेज फेरीअखेर तर तो टॉप टेनमध्ये होता. २३वा क्रमांक हे स्थान बऱ्याच मागचे वाटत असले तरी भारताची अश्वारोहणातील स्थिती पाहता ही कामिगरी फारच संतोषजनक आहे.

--------------- 17 ------------

पुरुषांचा ४ बाय ४०० मीटर रिले संघ पदक जिंकू शकला नसला तरी त्यांनी थेट आशियाई विक्रम आपल्या नावावर लावला.

--------------- 18 ------------

शिडाच्या नौकानयनात नेत्रा कुमानन ही थेट पात्र ठरलेली पहिली भारतीय महिला ठरली. तिला ऑलिम्पिकमध्ये यश मिळाले नसले तरी ऑलिम्पिकसाठी सेलींगमध्ये एखादी खेळाडू थेट पात्रता मिळवते हाच इतिहास होता.

--------------- 19 ------------

अशीच ऐतिहासिक कामगिरी जलतरणपटू सजन प्रकाश व श्रीहरी नटराज यांनी केली. ‘ए’ श्रेणीची पात्रता मिळवणारे ते पहिलेच भारतीय ठरले. याशिवाय माना पटेल हीसुद्धा युनिव्हर्सिटी कोट्यातून पात्र ठरली आणि ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिल्यांदाच एकाचवेळी तीन  जलतरणपटू आणि पहिल्यांदाच महिला जलतरणपटू सहभागी झाली.

--------------- 20 ------------

टेबल टेनिसमध्ये मनिका बत्रा ही दोन फेऱ्या पार करणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली.

--------------- 21 ------------

कुस्तीत रवीकुमार दहियाचे रौप्य आणि बजरंग पुनियाच्या कास्यपदकासह सलग चौथ्या ऑलिम्पिकमध्ये आपले कुस्तीगीर यश मिळवूनच मायदेशी परतले.

--------------- 22 ------------

यानंतर आता ताजे यश म्हणजे टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भाविनाबेन पटेल हिने रौप्यपदक जिंकून  भारतासाठी कोणत्याही प्रकारच्या ऑलिम्पिकमधील टेबल टेनिसचे पहिले पदक निश्चित केले आहे. 

--------------- 23 ------------

आॕलिम्पिकच्या आधी तिरंदाज दीपिका कुमारी हिने पॕरिस येथील वर्ल्ड कप स्टेज थ्री मध्ये चक्क सुवर्णपदकाची हॕट्ट्रीक साजरी केली. रिकर्व्ह प्रकारात महिलांच्या वैयक्तिक व सांघिक प्रकारासह पती अतानू दाससह तिने मिश्र गटाचेही सुवर्ण पदक जिंकले. 

--------------- 24 ------------

आॕलिम्पिक आहे म्हणून इतर खेळांतील चर्चा आहे पण एरवी आपल्याकडे खेळ म्हणजे क्रिकेट असे समीकरण झालेल्या क्रिकेटमध्येही इतिहास घडला. एकाचवेळी आपले दोन दोन संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. विराट कोहलीच्या नेतृत्वातील संघ इंग्लंडमध्ये तर शिखर धवनच्या नेतृत्वातील संघ श्रीलंकेत खेळला. 1998 नंतर पहिल्यांदाच असे घडले. 1998 मध्ये आपले संघ राष्ट्रकूल सामन्यांत आणि कॕनडात सहारा कपमध्ये एकाच वेळी खेळले. 

--------------- 25 ------------

आपला महिलांचा क्रिकेट संघसुध्दा 2014 नंतर प्रथमच म्हणजे 7 वर्षात पहिला कसोटी सामना खेळला आणि इंग्लंडविरूध्दचा हा सामना अनिर्णित राहिला. 

--------------- 26 ------------

टेस्ट क्रिकेटच्या पहिल्या वहिल्या वर्ल्ड चॕम्पियनशीपमध्ये आपण उपविजेते राहिलो. न्यूझीलंडचा संघ आपल्याला भारी पडला पण त्याआधी आॕस्ट्रेलियाला आॕस्ट्रेलियात नमवण्याचा पराक्रम आपण गाजवला. अॕडिलेड कसोटीत 36 धावांत बाद झाल्याच्या नामुष्कीनंतर भारतीय संघाची ही भरारी विलक्षण होती. त्यानंतर मायदेशात आपण इंग्लंडविरूध्दची मालिकासुध्दा 3-1 ने जिंकली.

--------------- 27 ------------

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अहमदाबादच्या मोतेरो येथे नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने खेळांच्या सेवेत रूजू झाले. 49 हजारावरुन या स्टेडियमची प्रेक्षक संख्या एक लाख 30 हजार एवढी झाली. 63 एकर क्षेत्रावर हे स्टेडियम आहे.

अशा उत्साह वाढविलेले अभिमानास्पद यश व घटनांनी यंदाचा राष्ट्रीय क्रीडा दिवस खास आहे याबद्दल दुमत असू नये. 


Write a comment ...

LalitMBA

Sports affecrionate, Nature lover, loves to roam freely, Simple soul