एकटी मनिका बत्रा चमकली, सिंधू व मेरी कोमची आगेकूच, बाकी निराशा!

एकटी मनिका बत्रा चमकली, सिंधू व मेरी कोमची आगेकूच, बाकी निराशा!

मीराबाई चानूच्या चंदेरी यशानंतर उत्साह वाढल्याने भारतीय खेळाडू टोकियो ऑलिम्पिकपध्ये दुसऱ्या दिवशी अधिक चांगली कामगिरी करतील ही अपेक्षा फोल ठरली. अपवाद टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिचा. गेल्यावेळची रौप्य पदक विजेती पी.व्ही.सिंधू व मेरी कोम यांनी विजयी सुरूवात केली असली तरी त्यांच्याकडून ते अपेक्षितच होते पण हॉकी, नेमबाजी, बॉक्सिंग, जलतरण, जिम्नॅस्टीक्स अशा सर्वच आघाड्यांवर अपयशच पदरी पडले. नौकानयनात अर्जुन जाट व अरविंद सिंग यांना पदक मिळणार नसले तरी त्यांनी रिपकेजमध्ये तिसरे स्थान मिळवून उपांत्य फेरी गाठून दिलासा दिला. नौकानयनात ते किमान १२ व्या स्थानी तरी राहणार आहेत आणि ऑलिम्पिक नौकानयनात भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

मनिका बत्रा हिने पदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकताना दुसऱ्या फेरीत आपल्यापेक्षा वरच्या क्रमांकाच्या खेळाडूला मात दिली. मनिका क्रमवारीत ६२ व्या स्थानी असून तीने ३२ व्या क्रमांकाच्या मार्गारिटा पेसोत्स्का हिला ०-२ अशी पिछाडी भरुन काढत ४-३ अशी मात दिली. तासभर रंगलेला हा सामना मनिकाने ४-११, ४-११, ११-७, १२-१०, ८-११, ११-५, ११-७ असा विजय मिळवला. मात्र मनिकाचा मार्ग आता आणखीनच कठीण बनला आहे. पुढच्या फेरीत तिला १६ व्या क्रमांकाच्या सोफिया पोल्कानोवा या ऑस्ट्रीयन खेळाडूचा सामना करायचा आहे. पुरुषांमध्ये साथियान गुनशेखरन याने प्रयत्नांची शर्थ केली पण त्याला हाँग़काँगच्या खेळाडूकडून सात गेममध्ये हार पत्करावी लागली.

पी.व्ही.सिंधूने इस्त्राईलच्या झेनियावर २१-७, २१-१० असा सहज विजय मिळवला तर मेरी कोमनेही विजयी सुरुवात करताना डॉमिनिकाच्या हर्नांडेज मिग्युलिना हीला ४-१ अशी मात दिली.

नौकानयनात अर्जुनलाल जाट व अरविंद सिंग यांनी उपांत्य फेरी गाठून भारतासाठी इतिहास घडवला असला तरी ते पदकाच्या शर्यतीतून बाद आहेत कारण रिपकेज फेरीतून पहिले तीन संघ जरी उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले असले तरी पदकांच्या स्पर्धत इतर संघ असतात ज्यांची ‘सी’ स्पर्धा म्हटली जाते.

मनिका बत्रा, पी.व्ही.सिंधू,, मेरी कोम आणि अर्जुन जाट व अरविंद सिंग सोडले तर रविवारी भारतासाठी लक्षात रहावे असे काही घडले नाही.

टेनिस महिला दुहेरीत सानिया मिर्झा व अंकिता रैना यांनी जिंकलेला सामना कसा गमवायचा याचे प्रात्यक्षीक दिले. युक्रेनच्या जुळ्या बहिणींविरुध्द पहिला सेट ६-० असा जिंकल्यावर आणि दुसऱ्या सेटमध्ये ५-३ अशा आघाडीवर स्वत:कडे सर्वीस असतानाही त्या सामना जिंकू शकल्या नाहीत. ६-०, ६-७ (८-१०)हा त्यांचा पराभव अतिशय धक्कादायक होता आणि चौथे ऑलिम्पिक खेळणारी आणि सहा ग्रँड स्लॅम स्पर्धा विजेती सानिया मिर्झासारखी खेळाडू असताना आपण असे कसे हरु शकतो असा प्रश्न पडावा असा हा सामना होता.

बराच गाजावाजा झालेल्या व अपेक्षा वाढवून ठेवलेल्या नेमबाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. त्यामुळे ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच १० मी. एअर रायफल व एअर पिस्तुल गटात एकही भारतीय नेमबाज अंतिम फेरीत पोहचलेला नाही. सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा, अपूर्वी चंदेला व एलावेनील वेलारिव्हन या पहिल्या दिवशी अपयशी ठरल्यानंतर आता रविवारी मनू भाकर, यशस्विनी देसवाल, दीपक कुमार व दिव्यांश सिंग पन्वर यांनीसुद्धा निराशा केली.

१० मीटर एअर पिस्तुलमध्ये मनू भाकर ही कमनशिबी ठरली. ऐन मोक्याच्या वेळी तिच्या पिस्तुलाच्या सर्किटमध्ये बिघाड झाल्याने बहुमुल्य वेळ वाया गेला तरीसुद्धा ३४ मिनिटात ५७५ गुणांची तिने समाधानकारक कामगिरी बजावली पण हे गुण तिला अंतिम फेरीत स्थान देऊ शकले नाहीत. ती शेवटी १२ व्या स्थानी राहिली तर यशस्विनी १३व्या स्थानी राहिली. १० मीटर एअर रायफलमध्ये दीपक कुमार २६ व्या आणि दिव्यांशसिंग पन्वर ३२ व्या स्थानी राहिला.

पहिल्या सामन्यात न्यूझीलंडवर ३-२ असा विजय मिळवलेल्या पुरुषांच्या हॉकी संघाला रविवारी ऑस्ट्रेलियाने ७-१ असा सपाटून मार दिला. भारताच्या हॉकी संघाचा ऑलिम्पिक मधील हा सर्वात मोठा पराभव ठरला. बॉक्सर मनिष कौशिकही पहिली फेरी पार करु शकला नाही. आर्टिस्टीक जिम्नॅस्टीक्समध्ये प्रणाती नायक ही अंतिम फेरी गाठू शकली नाही. व्हॉल्टच्या स्पर्धाप्रकारात दुसरा प्रयत्न करण्यास तिने दिलेला नकार धक्कादायक होता. जलतरणात श्रीहरी नटराज व माना पटेल हे पात्रता स्पर्धेतच बाद झाले. मात्र श्रीहरी हा क्लासिफिकेन ए स्पर्धात सहभागी होणारा पहिला भारतीय जलतरणपटू ठरला.

Write a comment ...

LalitMBA

Sports affecrionate, Nature lover, loves to roam freely, Simple soul